बँक कर्मचाऱ्याच्या घरात भयानक घटना, दोन वर्षांचा मुलगा बंदुकीच्या गोळीने जखमी, प्रकरणाच गुढ वाढलं
Chhatrapati Sambhaj Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चिमुकल्याच्या कपाळामध्ये गोळी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaj Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या घरात बंदुकीची गोळी लागून त्याचा अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस (Chhatrapati Sambhaj Nagar Police) घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावठी कट्ट्यातून ही गोळी सुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बॅंक कर्मचाऱ्याकडे गावठी कट्टा कुठून आला सवाल केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. आर्यन राहुल राठोड असे जखमी अडीच वर्षीय मुलाचे नाव आहे. मुलाच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत
बीड जिल्ह्यातील राहुल कल्याण राठोड आणि संगीता राठोड असे पती-पत्नी मुलासह अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये भाड्याने राहतात. राहुल हा शहरातील खाजगी कर्ज वितरण करणाऱ्या बँकेत कामाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या घरातून अचानक जोराचा आवाज झाला. त्यानंतर राहुल आणि त्याची पत्नी जखमी मुलाला घेऊन रुग्णालयाकडे धावत निघाले होते.
यावेळी आई मुलाला गोळी लागली असं म्हणून जोरजोरात रडत होती. त्यामुळे परिसरातील महिला आणि नागरिक घराबाहेर आल्या आणि याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला. तपासामध्ये घराच्या स्वयंपाक खोलीमध्ये पोट माळ्यावर एक गावठी कट्टा आढळून आला. त्यातून तीनपैकी दोन गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. यावेळी घरात जागोजागी रक्ताचे थेंबही आढळून आले आहे. हा गोळीबार नेमका कोणी केला, का केला याबाबत स्पष्टता समोर आलेली नसून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.मात्र बँक कर्मचाऱ्याकडे गावठी कट्टा कुठून आला हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.