विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (chhatrapati sambhaji nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विहिरीच्या (well) कामासाठी लाच मागितली म्हणून संतापलेल्या सरपंचाने अनोखे आंदोलन केले आहे. लाच (bribe) मागितली म्हणून या सरपंचाने (sarpanch) चक्क दोन लाख रुपये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उडवले आहेत. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. भ्रष्ट अधिकारी विहिरीच्या कामासाठी लाच मागत असल्याचा आरोप करत या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा हवेत उडवल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विहिरीसाठी लाच मागत असल्याचा आरोप करत गेवराई पायगा येथील मंगेश साबळे या सरपंचाने गावातील शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये गोळा केले होते. त्यानंतर फुलंब्री पंचायत समिती समोर या नोटांच्या बंडलाचा हार गळ्यात घालून त्यातील  नोटा हवेत उडवत मंगेश साबळे यांनी आंदोलन केले आणि अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवला. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये सरपंच मंगेश साबळे हे दोन लाख रुपये हवेत उडवताना दिसत आहेत. यावेळी साबळे यांनी जोरजोरात घोषणाबाजी देखील केली.



"रक्ताचे पाणी करुन शेतकरी विहीर करतो. त्यानंतर विहिरीला पाणी लागले की नाही कळत नाही. पाणी जरी लागले तरी तो माल पिकतो की नाही याचा भरवसा नाही. म्हणून सन्मानिय बीडीओ मॅडम यांना शेतकऱ्यांच्या घामाने कमावलेला पैसा आम्ही देत आहोत. जर एवढ्या पैशानेही तुमचे पोट भरत नसेल आणि आमच्या विहिरी मंजूर होत नसतील तर सन्मानीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनासमोर शेतकऱ्यांना घेऊन जातो आणि कपडे काढून तिथे बसतो तसेच आणखी पैसे देतो," असा आक्रोश मंगेश साबळे यांनी व्यक्त केला.


"प्रत्येक शेतकऱ्याकडून पैसे जमा करुन दोन लाख रुपये घेऊन आलो आहे आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हे पैसे देत आहोत. हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करुन द्या. जर विहिरी मंजूर केल्या नाहीत तर लाचलुचपत प्रतिबंधक विभामागाचे पोलीस अधिकक्षांच्या कार्यालयासमोर आम्ही भीक मागू आणि ते पैसे तुम्हाला देऊ. मी अपक्ष सरपंच म्हणून निवडून आलो आहे. मी पैसा वाटलेला नाही. मी कुठल्या तोंडाने शेतकऱ्यांकडे कामासाठी पैसे मागवू. तुम्ही जर कोणाचे ऐकून फक्त पैसेवाल्यांच्या विहीरींचे काम करणार असाल तर गरिबांचे काम कोण करणार?," असा सवालही मंगेश साबळे यांनी केला आहे.