विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजी नगर :  डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar University) पदवीच्या परिक्षा सुरु (Degree Exam) आहेत. या परिक्षेत अवघ्या 500 रुपयात मास कॉपी (Mass copy) सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार शेंद्रा इथल्या दळवी महाविद्यालयात (Dalvi College) उघड झाला आहे. सकाळी पेपर द्यायचा आणि संध्याकाळी 500 रुपये देवून पुन्हा तोच पेपर सोडवायचा असा हा गोरखधंदा सुरु होता.  हा सगळा प्रकार एक धाडसी विद्यार्थीनीने उघड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास कॉपीचा धक्कादायक प्रकार
विद्यार्थी थेट पेपरच्या गठ्ठ्यातून पेपर काढून पेपर लिहत असल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. शेंद्रा इथल्या वाल्मिकराव दळवी महाविद्यालयात फॉरेन्सिक पेपरचं सेंटर आहे. सकाळी 11 ते दीड हा परीक्षेचा कालवधी आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना पेपर अवघड जात असले किंवा अपूर्ण सोडवला असेल त्या विद्यार्थ्यांनासाठी या सेंटरवर विशेष स्किम होती. परीक्षेच्या निर्धारित वेळेत पेपरवर केवळ नाव लिहून पेपर कोरा सोडायचा. 


त्यानंतर बाजूच्या एका दुकानावर जावून 500 रुपये द्यायचे आणि 4 वाजता पुन्हा वर्गात येऊन पेपर पुस्तकात पाहून नव्यानं लिहायचा. 23 तारखेला पेपर सुरु झाला तेव्हापासून हा गोरखधंदा सुरु होता. हा प्रकार पाहून इथल्या एका विद्यार्थीनीनंही रोहित नावाच्या एजंटला कॉल केला आणि आम्हालाही असाच पेपर लिहायचा म्हणून तिनं त्याच्याशी संवाद साधला.


धाडसी विद्यार्थिनीने फोडली वाचा
या धाडसी मुलीनं झी 24 तासच्या कॅमेऱ्यासमोरही याची कबूली दिली. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता, अखेर कंटाळून हा प्रकार  उघड केला आणि याची पोलिसांतही या मुलीनं तक्रार दिलीय. यावर कारवाई करावी आणि परिक्षाच नव्यानं घ्यावी अशी मागणी या विद्यार्थीनीने केली आहे.


या प्रकारानंतर झी 24 तासची टीम थेट दळवी कॉलेज मध्ये पोहोचली तिथं गेल्यावर आम्हाला दिसला तो कॉप्यांचा खच, पहाव तिकडे कॉपीच कॉपी, मात्र या विद्यार्थ्यांकडून जप्त केलेल्या कॉपी असल्याची सारवासारव कॉलेज प्रशासनानं केली. इतकचं नाही तर आमच्या कडे 500 रुपयांत कुठलाही पेपर लिहल्या जात नाही, आमचा काही संबंध नाही अशी सारवा सारव कॉलेजने केलीय.


झी २४ तासचा इम्पॅक्ट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या धक्कादायक गैरप्रकाराची बातमी झी २४ तासने दाखवली आणि विद्यापीठाचे कुलगुरु प्रमोद येवले यांनी त्याची दखल घेतलीय. दोन दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासनही कुलगुरुंनी दिलंय.. छत्रपती संभाजीनगरात शिक्षणाचा बाजार मांडला गेल्याचा व्हिडिओ सर्वात आधी झी 24 तासनं दाखवला होता. पदवी परीक्षेच्या पेपरची 500 रुपयांत विक्री केली जातेय. सकाळी  परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी पुन्हा पेपर लिहिण्यास दिलं जात असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.