'हे राज्य व्हावं ही तो श्रींची ईच्छा' असं म्हणणाऱ्या या सह्याद्रीच्या राजाची तिथीनुसार जयंती 28 मार्चला साजरी करण्यात येत आहे. महाराजांनी मुघल, पोर्तुगीज,डच आणि फ्रेंच यांसारख्या परकीय सत्तांशी युद्ध आणि वेळप्रसंगी तह केल्याचे इतिहासात अनेक पुरावे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांचा राजा
लढवय्या योद्धा आणि दूरदृष्टी या प्रमाणेच  छत्रपती शिवरायांना शेतकऱ्यांचा राजा म्हटलं जातं. मुघल सत्तेचं सैन्य शेतकऱ्यांच्या शेतातून  पिकाची नासधूस करत जात असे. मेहनतीने पिकवलेलं पिक क्षणात जमिनदोस्त होत असे. छत्रपती शिवरायांच्या आधी राज्य सांभाळणारे राजे महाराजे  रयतेकडून अतिरिक्त कर आकारत असे.  खोत ,सावकार आणि कुलकर्णी यांच्याकडे गरीब शेतकरी कुटुंबातील कित्येक पिढ्यांपिढ्या कर्जामध्ये दबून जात असतं. ही सगळी बाब लक्षात घेत महाराजांनी स्वराज्यात शेतीचं नवं धोरण काढलं . रयतेच्या भाजीच्या देठासही धक्का लागता कामा नये ही काळजीच फक्त महाराजांनी घेतली नाही तर, त्यासंबंधित कायदे देखील अंमलात आणले. सैन्याला रयतेच्या शेतातून जाण्यास मज्जाव केला. तसंच कर्जामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्तेचं वाढतं प्रमाण कमी व्हावं याकरीता शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारं आणि बियाणं एका ठराविक काळापुरतं शेतकऱ्यांना दिलं जातं होतं. शेतीची कामं झाल्यावर अवजारं आणि बियाणं स्वराज्याच्या ताफ्यात जमा केलं जात असे. 


 


स्त्रियांचा आदर
मुघल साम्राज्यात आणि हिंदू राजे महाराजांच्या काळात स्त्रियांच्या अब्रुला किंमत दिली जात नसे. स्त्री म्हणजे उपभोगाची जिवंत बाहुली असं तिच्याकडे पाहण्याचा त्याकाळी समाजाचा दृष्टीकोन होता. शेतकऱ्यांच्या वयात आलेल्या लेकी सुनांच्या अब्रुची मुघल सैन्य आणि सावकार लांडग्यासारखी लक्तरं तोडत असतं पण या अन्यायावर दाद मागण्याचा मार्ग नव्हता. मात्र  स्वराज्यात स्त्रीच्या अब्रुला देवीचं स्थान दिलं गेलं. परस्त्री मातेसमान हा विचार महाराजांनी जनमाणसात फक्त रुजवलाच नाही तर ,स्त्रीयांच्या अब्रुची विटंबना करणाऱ्या आरोपीला देहदंडांची शिक्षा दिली जायची. त्यामुळे असा हा राजा आणि या राजाचं स्वराज्य रयतेला आपलंसं वाटत असे. 


धर्मनिष्ठा 
माहाराजांनी मुसलमान धर्मिय राजांशी युद्ध केलं असून शिवराय हे मुस्लिम धर्माचा द्वेष करत होते असा चुकीचा समज मोठ्या प्रमाणात समाजात पसरलेला आहे. खरंतर महाराजांच्या काळात धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला महत्व जास्त होतं. जो राजा आपल्याला दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करुन देतो त्याच्याप्रति सैन्याची निष्ठा असे. महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार चाकरी करत होते. दौलतखान, दर्यासारंग आणि मदारी मेहतर अशा मातब्बर सरदारांची शिवरायांप्रति  फक्त स्वामीनिष्ठा नव्हती तर वेळ प्रसंगी मुस्लिम राजांच्या विरोधात लढत आपल्या प्राणाची आहुती दिली. महाराजांच्या सैन्यात अठरा पगड जाती आणि मुस्मिम समाजातील मावळे स्वराज्याची कामी आले होते. 



निसर्गाविषयी कृतज्ञता
आरमार उभारणीच्या बांधकामाला आणि होड्या तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सागवणीची गरज होती. वटवृक्ष आणि फणस आंब्याच्या अशा डेरेदार झाडांच्या खोडाची गरज होती मात्र महाराजांनी सरसकट वृक्ष तोडीला विरोध दर्शविला. सावली देणारी ही झाडं मोठी व्हायला बराच काळ घेतात. त्यामुळे घनदाट झाडं तोडल्याने पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होईल हे महाराजांनी जाणलं होतं. म्हणूनच ज्या झाडांची आयुष्यमर्यादा संपत आली किंवा जी झाडं उन्हामुळे जळून गेली,अशा झाडांच्या मालकाला योग्य मोबदला देत महाराजांनी आरमारासाठी लागणाऱ्या सरपणासाठी सुवर्णमध्य काढला होता. युद्धनितीच्या पलिकडे जाऊन स्वराज्यात सर्व धर्म समाभाव हा विचार खऱ्या अर्थाने माहारांनी स्वराज्यात रुजवला आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचा आपला राजा वाटत असे.