औरंगजेबाला मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही - योगी आदित्यनाथ
CM Yogi Adityanath Pune : गीता भक्ती अमृत महोत्सवात मुख्यमंत्री योगींनी जय श्री रामचा जयघोष करत भाषणाची सुरुवात केली.
CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी महाराष्ट्राच्या पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेद श्री तपोवन मठात आध्यात्मिक गुरू गोविंद देव गिरी महाराज यांची भेट घेतली. आळंदीमध्ये आज गीता-भक्ती अमृत महोत्सवाचा समारोप होत आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बाबा रामदेव, श्री श्री गोविंद महाराज, दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेबाला कोणी विचारत नाही असं म्हटलं आहे.
पुण्याच्या आळंदीमध्ये गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात अनेक प्रतिष्ठित साधू संत सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील सामील झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भक्तीतून निर्माण होणारी ही शक्ती नेहमी शत्रूंचा पराभव करते असे म्हटलं आहे.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
"मला आळंदीत येण्याचं सौभाग्य लाभलं. सनातन धर्मासाठी मी काम करतो. ज्ञानेश्वर महाराज यांच्या परंपरेला नमस्कार करण्यासाठी आळंदीत आलोय. लहानपणी मी ज्ञानेश्वरीच वाचन केले आहे. त्यांच्या आळंदीत येण्याची इच्छा होती. ज्यांनी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. एकाच परिवारात चार संत होऊन गेले हे महाराष्ट्रासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. शेकडो वर्षे झालं त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आहे. महाराष्ट्र नशीबवान आहे कारण शेकडो वर्षांपासून तुम्हाला संतांचा आशीर्वाद मिळत आहे. भक्तीतून निर्माण झालेली ही शक्तीच शत्रूंचा नेहमीच पराभव करते. समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज इथूनच आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतात तेज पसरवलं होतं. त्या कालखंडात त्या औरंगजेबाच्या साम्राज्याला आव्हान दिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला तफडण्यासाठी आणि मरण्यासाठी असं सोडून दिलं की आजपर्यंत त्याला कोणी विचारत नाही," असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
मी नाथ संप्रदायाचा सामान्य अनुयायी आहे. आमचे नाते छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे, मुघलांशी नाही, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.