Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात परत आणली जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या वाघनखांसंदर्भात नवीन माहिती समोर आली असून ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं कर्जावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. म्हणजेच महाराष्ट्र सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली ही वाघनखं 3 वर्ष राज्यात ठेवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. हे पैसे सध्या या वाघनखांचा ताबा असलेल्या व्हिक्टोरिया अॅण्ड अलबर्ट संग्रहालयाला द्यावे लागणार आहेत. राज्याच्या संस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या शासन आदेशामध्ये याचा उल्लेख आहे.


कुठे कुठे प्रदर्शनात ठेवली जाणार ही वाघनखं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनखं पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. 


11 सदस्यांची समिती


लंडनवरुन ही वाघनखं राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनखं सुरक्षितपणे राज्यात आणण्याची जबाबदारी या 11 सदस्यांवर असणार आहे. तसेच राज्यामधील 4 संग्रहालयांमध्ये ही वाघनखं कधी, कुठे आणि कशी सर्वसामान्यांना पाहता येतील यासंदर्भातील सविस्तर नियोजन करण्याचं कामही याच 11 जणांकडे सोपवण्यात आलं आहे. 


मुनगंटीवार करणार स्वाक्षरी, शिंदें राहणार होते उपस्थित पण...


मुनगंटीवार यांनी ही वाघनखं नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतात आणली जातील अशी माहिती दिली होती. मुनगंटीवार हे स्वत: ही वाघनखं आणण्यासाठी लंडनला जाणार आहेत. तिथे राज्य सरकारच्यावतीने वाघनखांसंदर्भातील सामंजस्य करारावर मुनगंटीवारच स्वाक्षरी करणार आहेत. या करारामध्ये हे वाघनखं 3 वर्षांसाठीच भारताकडे असणार आहे अशी अट आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कराराच्या वेळेस लंडनमध्ये मुनगंटीवार यांच्याबरोबर उपस्थित राहणार होते. मात्र आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी हा दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे हे नियोजित दौऱ्यानुसार युनायटेड किंग्डमबरोबरच जर्मनीलाही जाणार होते.


त्या 11 जणांमध्ये कोणाकोणाचा समावेश?


11 सदस्यांच्या या गटामध्ये राज्यातील संस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव विकास खर्गे यांचाही समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही यामध्ये समावेश आहे. तसेच राज्यातील पुरातत्व विभाग आणि संग्रहालय निर्देशक तेजस गर्गे यांचाही यामध्ये समावेश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं स्टीलपासून बनवण्यात आली आहेत. यामध्ये पुढील बाजूस वाघनखांंप्रमाणे तीक्ष्ण टोकं आहेत. बोटांमध्ये ही वाघनखं घालता यावीत म्हणून वरील बाजूस 2 अंगठ्यांसरखी धातूची वर्तुळं आहेत. व्हिक्टोरिया अॅण्ड अलबर्ट संग्रहालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये भारतामध्ये ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली तर त्या काळातील हत्यारांसंदर्भातील संशोधनाला अधिक वाव मिळेल.