Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले आहेत. 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिलेला भाजपा पक्ष 300 जागाही पार करु शकलेलं नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. अद्याप आकडेवारी पूर्णपणे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने 2 वर्षात आणि मोदी सरकारने 10 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती लोकांनी दिली आहे असं ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेश म्हस्के यांच्य़ा विजयानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य दिलं आहे. मी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ठाणे शिवसेनेचा, धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम असलेला बालेकिल्ला आहे. महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रुपाने डौलाने फडकत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी त्यांना भरभरुन प्रतिसाद दिला आणि बालेकिल्ला अबाधित ठेवला. ठाण्यात लोकांनी विकासाला मतदान केलं आहे. राज्य सरकारने 2 वर्षात आणि मोदी सरकारने 10 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती लोकांनी दिली आहे".


देशात 6 वाजेपर्यंत जे निकाल हाती आले आहेत त्यानुसार एनडीएला 292, इंडिया आघाडीला 234 आणि इतरांना 17 जागा मिळत आहेत. तसंच राज्यात महायुतीला 18, महाविकास आघाडीला 29 आणि इतरांना 1 जागा मिळताली आहे.