Eknath Shinde on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. 8 महिन्यातच पुतळा कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, कामावर प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या मिंधे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असं सांगितलं आहे. तसंच झालेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. 


एकनाथ शिंदे काय म्हणाले?


"झालेली घटना योग्य नाही, छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. तो पुतळा उभारला तेव्हा त्या कार्यक्रमाला आम्हीसुद्धा होतो. हा पुतळा नौदलाकडून उभारला गेला होता, त्याचं डिझाईन नौदलाने तयार केलं होतं," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 


पुढे ते म्हणाले की, "मी जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो. त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी जात आहेत. नौदलाचे अधिकारी आणि आमचे काही अधिकारी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिमाखात उभा राहील यासाठी उद्या पाहणी करू. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत असून हा पुतळा आम्ही तात्काळ उभारू". 


आदित्य ठाकरेंचा संताप


आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे अशा शब्दांत आपल्या संताप व्यक्त केला आहे. "आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही! निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्धाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक आज केवळ ८ महिन्यातच कोसळलं.  मिंधे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे.  त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही.  आज जेव्हा आमच्या महाराजांचा पुतळा पडलेला पाहिला तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्या. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या मिंधे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं! महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रतिमेला सांभाळायला हवं!", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.