पंढरपूर : अखंड महाराष्ट्राचं अराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाचरणी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व वारकरी आणि महाराष्ट्राच्या वतीनं साकडं घातलं आहे. आषाढी एकादशीच्या पर्वावर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरच्या श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शासकीय महापूजेच्या वेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. महापूजेच्या वेळी विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे आणि त्यांच्या पत्नीला मानाचे वारकरी म्हणून विठुरायाची पूजा करण्याची संधी मिळाली. बडे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगूळचे रहिवासी आहेत. यंदा दर्शनासाठीची रांग नसल्यामुळं मंदिर समितीमधून मानाचे वारकरी निवडण्यात आले आहेत. विणेकरी म्हणून सेवा करणाऱ्या ६ जणांमध्ये चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. यावेळी विठुरायाकडे साकडं घालत मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे महापूजा करावी लागेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. 


'आता आम्ही मानवांनी हात टेकले आहेत. त्यामुळं देवा आता चमत्कार दाखव आणि कोरोनाला आजच्या या आषाढीच्या पर्वापासूनच दूर कर असं मागणं घातलं आहे. सर्व संकटं दूर नेण्यासाठी साकडं घातलं', असं मुख्यमंत्री म्हणाले. 



 


दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात भक्तीचा जनसागर लोटल्याचं पाहायला मिळतं. पण, यंदाच्या वर्षी मात्र कोरोना व्हायरनं हाहाकार माजवल्यामुळं विठुरायाला वारकऱ्यांची भेट घडलेली नाही. त्यामुळं आषाढीच्या दिवशी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.