मुंबई : राज्यात अनलॉक-१ सुरु केल्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मुंबईत दुकाने सुरु करण्यात आली आहे. तसेच टॅक्सी वाहतूकही सुरु झाली आहे. राज्यातही थोडीशी शिथिलता देण्यात आली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळ आणि पावसाने तडाखा बसलेल्या भागाचा पाहणी दौरा केला. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी वेस्टर्न कोलफिल्डच्या नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचा ऑनलाईन शुभारंभ करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजता वेस्टर्न कोलफिल्डच्या  नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचा ऑनलाईन शुभारंभ होत आहे. एकूण तीन खाणींचा शुभारंभ आज होत आहे. उर्वरित दोन मध्यप्रदेशमधील आहेत. या शुभरंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील ऑनलाईन सहभागी होणार आहेत. आदासा येथील खाणीत ३३५ कोटी रुपये गुंतवणूक होत असून १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल. याच वर्षी ही खाण सुरु होणार आहे.


 दरम्यान, दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर रायगड जिल्ह्यातील माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे.  या निर्णयामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.


दक्षिण रायगड जिल्ह्यात डीएमआयसीसाठी एकूण १२,१४० हेक्टर क्षेत्र २०११ मध्ये अधिसूचित करण्यात आले. त्यापैकी ३२७७ हेक्टर क्षेत्राचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी संमती न दिलेली व वन विभागाच्या ताब्यातील क्षेत्रे यापूर्वीच वगळण्यात आलेली आहेत.