प्रणव पोळेकर झी मीडिया चिपळूण: महापुरानं कोकणात पुरता हाहाकार माजवला आहे. या पुरानं चिपळूणमधील नागरिकांचं तसंच व्यापा-यांचं प्रचंड नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौ-यात जनतेच्या या आक्रोशानं मन हेलावून गेलं.हा आक्रोश आहे आपलं सर्वस्व हिरावलेल्या चिपळूणकरांचा आहे.हा आक्रोश आहे प्रशासनाच्या नाकर्तेपणा विरोधातला आणि हा आक्रोश आहे जगण्यासाठी आर्त विनवणी करणारा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाहणी दौ-यात अखेर चिपळूणकरांना अश्रू अनावर झाले आणि मुख्यमंत्र्यांसमोर सर्वजण धाय मोकलून रडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार दिवसात आभाळ फाटावं तसा कोकणात धो धो पाऊस कोसळलाय. या पावसानं कोकणची पुरती वाताहात झाली आहे. चिपळूण बाजारपेठेत 12 फुटापर्यंत पुराचं पाणी आलं होतं. धान्य गेलं, कपडे गेले, होतं नव्हतं त्या सा-याचा चिखल झाला. आता उरला तो फक्त वेदनांचा गाळ आणि डोळ्यातून घळाघळा वाहणारे अश्रूच. पावसानं सारं नेलं आणि मागे ठेवला फक्त चिखल गाळ आणि निराशा.



कोकणी माणूस हा मुळातच कष्टाळू असं म्हटलं जातं. कितीही मोठं संकट आलं तरी त्याला धीरानं सामोरं जाणारा. पण चिपळूणमध्ये तर आभाळच फाटलं आणि होत्याचं सारं नव्हतं झालं. कोकणवासियांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत. कारण देणाऱ्यांचे हात हाच त्यांच्यासाठी आशेचा एकमेव किरण उरला आहे. यातून सावरण्यासाठी सरकार नक्की मदत करेल अशी अशा या नागरिकांना आहे. त्यामुळे सरकारकडे मदतीसाठी हात जोडून विनवणी प्रत्येक चिपळूणकर करत आहे.