चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन
चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन झाले आहे.
मुंबई / पुणे : प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. चितळे यांच्या उद्योगाची भरभराट ही नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे, अशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे.
डेअरीची स्थापना भास्कर गणेश तथा बाबासाहेब चितळे यांनी केली. त्यांच्यानंतर काकासाहेब चितळे आणि नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली. चितळे डेअरी म्हटले, श्रीखंड आणि भाकरवडी हे दोन पदार्थ खूपच प्रसिद्ध आहेत. पुण्यात चितळे डेअरीची अनेक उत्पादने प्रसिद्ध आहेत. तसेच मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमध्येही चितळे डेअरीजचे पदार्थ मिळतात. त्यांनी दुधाच्या व्यवसायापासून सुरुवात केली. आता त्यांची अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
काकासाहेब चितळे यांनी मोठ्या हिमतींने आपला उद्योग राज्यात नाही तर देशात आणि परदेशात नेला. चितळेचे उत्पादन म्हणजे चोख आणि चांगले, असा ब्रॅंड तयार केला. चितळेंचा नावलौकीक हीच त्यांच्या उत्पादनाची खरी ओळख आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध आणि प्रक्रिया, विविध दुग्ध उत्पादने तयार करण्याचे काम ही कंपनी करते आहे. महाराष्ट्रासह जगभरात एक नामांकित ब्रॅंड म्हणून चितळे उद्योग समूह ओळखला जातो. चितळे दूध, दही, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ही चितळे उद्योग समूहाची ओळख आहे.
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
काकासाहेब चितळे यांनी केवळ व्यवसाय केला नाही तर दुग्ध उत्पादन कसे वाढेल तसेच चांगल्या गाई व म्हशींच्या प्रजाती कशा निर्माण होतील यासाठी संशोधनावर भर दिला. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी असलेला मेहनती व अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला आहे, अशा शोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या क्षेत्रात उद्योग उभारू इच्छिणाऱ्या अनेक नव उद्योजकांसाठी चितळे यांच्या उद्योगाची भरभराट ही नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे. माझी काकासाहेबांना विनम्र श्रद्धांजली आहे.