विशाल करोळे, औरंगाबाद : कोरोना लस येण्याआधीच लसीचा काळाबाजार सुरू झाला आहे. औरंगाबादेतल्या काही उतावीळ नागरिकांनी काळ्या बाजारातून लस टोचून घेतल्याची चर्चा आहे. तर लसीसाठी काही महाभागांनी थेट मुंबई-पुणं गाठलं आहे. या धक्कादायक प्रकाराची आरोग्य खात्यानं आता चौकशी सुरू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लसीसाठी उतावीळांची धावपळ पाहायला मिळाली. लसीसाठी काळ्या बाजारात चक्क 2300 रुपये मोजले गेले. त्यामुळे औरंगाबादमध्ये 'चोरी चोरी चुपके चुपके' कोरोना लसीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.


कोरोनाची लस येण्याआधीच औरंगाबादकरांनी पहिला नंबर लावला आहे. या उतावळ्यांना लस टोचून घ्यायची एवढी घाई झालीय की, त्यांनी काळ्या बाजारात लस विकत घेतल्याची चर्चा आहे. प्रत्येकी 2300 रुपये मोजून काहींनी औरंगाबादेत गुपचूप गुपचूप लस टोचून घेतली. तर काही महाभागांनी थेट मुंबई-पुण्याकडं धाव घेतल्याचं सांगितलं जातं आहे. ही लस खोटी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


चोरी चोरी चुपके चुपके सुरू असलेल्या लसीकरणाची चर्चा आता आरोग्य खात्यातल्या अधिकाऱ्यांच्याही कानावर गेलीय. मात्र कोरोना लसीकरणासाठी घाई करून जीवाशी खेळ करू नका, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.


अति घाई, संकटात नेई.. असं म्हणतात. कोरोना लसीला अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर सरकारी नियमानुसार लसीकरण मोहीम राबवण्यात येणाराय. पण त्याआधीच घाई केल्यास हा उतावीळपणा जीवावर बेतू शकतो.