भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू
हाणामारीत १० ते १२ जण जखमी
सांगली : सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. उपसरपंच निवडीच्या वेळी झालेल्या हा हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्धन काळे यांचा मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायतीच्या बाहेर काळे यांना डोक्यात लाकडी दंडक्याने जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. बोरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकींमधील विजयी उमेदवारांमधून उपसरपंच पदाची निवड होणार होती. आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत ही दुर्घटना घडली.
या संपूर्ण हाणामारीत १० ते १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज दुपारी हा सगळा प्रकार घडला. नामदेव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. उपसरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरु होताच दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले.
कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.