विशाल करोळे, झी मीडिया, संभाजी नगर : भरधाव कारच्या अपघातात (Car Accident) एका दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना संभाजी नगनरमध्ये (Sambhaji nagar) घडलाय. वडिलांचा कार घेऊन हा विद्यार्थी निघाला होता. मात्र वेगमर्यादा (Speed Limit) ओलांडल्याने विद्यार्थ्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. या अपघातात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या मृत्यूच्या ठिकाणीच मुलाचा मृत्यू


दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा वडिलांची कार चालवण्याच्या नादात जीव गेलाय. शुक्रवारी पहाटे आकाशवाणी चौकात जालना रोडवर हा सर्व प्रकार घडलाय. भरधाव वेगात असलेल्या कारची स्कायवॉकच्या पिलरला धडक बसली आणि दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे 10 वर्षांपूर्वी याच ठिकाणी या विद्यार्थ्याच्या आईचाही रस्ता ओलांडताना मृत्यू झाला होता. तिथेच आज मुलाचाही मृत्यू झालाय.


पिलरमध्ये कार अडकल्याने चेंदामेंदा


वडील आणि बहीण झोपी गेल्याचे पाहून 17 वर्षीय सोहम नवलेने कार घराबाहेर काढली होती. जालना रस्त्यावरून सेव्हन हिल्सच्या दिशेने जात असताना कारचा वेग ताशी 120 किमीपर्यंत पोहोचला. आकाशवाणी चौकात सोहमचे नियंत्रण सुटल्याने कार 70 फूट घासत जात एसएफएसमोरील स्कायवॉकच्या पिलरवर जाऊन आदळली. कार पिलरमध्ये घुसल्याने तिचा अडकून चेंदामेंदा झाला. गुरुवारी मध्यरात्री  2 वाजता झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणाऱ्या सोहमचा जागीच मृत्यू झाला. पोलीस, अग्निशमन विभागाला पिलरमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी दोन तास लागले. 


दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू


दरम्यान, गुरुवारी झालेल्या दोन अपघातामध्ये तीन दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. दहावीचा पेपर देऊन परतणाऱ्या राधा आवटे या विद्यार्थिनीच्या अंगावर झाडाची फांदी फडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. राधा दहावीचा मराठीचा पेपर देऊन भावासोबत बाईकवरुन ढेकळेवाडी येथे नातेवाईकांकडे जात होती. त्यावेळी बार्डी रोडवरील एमएसईबी कार्यालयाच्या जवळ असलेल्या पेटलेल्या झाडाची फांदी राधाच्या अंगावर पडली. यामध्ये राधाच्या डोक्याला मार लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला.


दुसरीकडे नाशिकमध्ये दहावीचा पेपर देण्यासाठी जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शुभम रामनाथ बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे अशी दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत.  सिन्नर- घोटी महामार्गावरील आगासखिंड शिवाराजवळ त्यांची दुचाकी टँकरवर आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.