कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेश
CM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
CM Eknath Shinde: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांसाठी क्लस्टर योजना राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील 27 गावांतील धोकादायक तसेच अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करुन त्यांच्यासाठी क्लस्टर योजना राबवावी तसंच, त्यासाठी आराखडा तयार करावा. यामुळं गावांचा विकास होण्यास गती मिळेल, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीयोजनेबाबतही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके पाणी पुरवण्यासाठी अमृत योजनेचे स्वरूप अधिक विस्तारित करण्यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली.
कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. त्यामुळं पाण्याची गरज वाढली आहे. शहरांना अतिरिक्त पाण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या बारवी धरणातून किमान 80 ते 85 एमएलडी अतिरिक्त पाणी देण्यात यावे. तसंच, सूर्या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यातूनदेखील अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
27 गावांसाठी क्लस्टर योजना
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावातील विविध प्रश्नांवरदेखील या वेळी चर्चा झाली. 27 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करुन घेण्यात यावा. तसंच, गेल्या काही वर्षांपासून शहरात अनधिकृत बांधकाम वाढले आहे. त्यावरही तोडगा काढण्यासाठी या बांधकामांचे सर्वेक्षण करुन क्लस्टर योजना राबवावी त्यासाठी आराखडा तयार करावा, असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी मागणी केली आहे.