नागपूर : नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन आज पुन्हा विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प लादणार नसल्याचा पुनरुच्चार केलाय. शिवाय सुभाष देसाई यांनी नाणारच्या जमीन संपादनाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भातली फाईल पाठवलीय. पण अद्याप त्यावरही निर्णय घेतेलेला नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळे अधिसूचना अद्याप रद्द झालेलीच नाही, हेही यानिमित्तानं स्पष्ट झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेत नाणारच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेला आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्यावेळी नाणारच्या प्रकल्पाविषयी गैरसमज पसरवण्यात आल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. सरकार सर्वांशी चर्चा करत आहे. चर्चेनंतरच प्रकल्पाविषयी अंतिम निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 


मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानतंर विरोधीपक्षनेते विखे-पाटील यांनी अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय आजच्या आज निर्णय घ्यावा अशी मागणी केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरकारनं गोलगोल उत्तरं न देता सभागृहाला प्रझेंटशन द्यावं अशी मागणी केली.  शिवसेना सुनील प्रभू यांनी नाणारचा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, असं म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाविषयी हो किंवा नाही या शब्दात उत्तर द्यावं असं म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनीही त्यांना खुमासदार उत्तर दिलं. यानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं.