मुंबई : राज्यात सत्तासंघर्ष पूर्णविराम घ्यायचे नाव घेत नाही. कोणत्याही पक्षाला बहुमत सिद्ध करता येत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. अशावेळी अवकाळी पाऊस, मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधी हे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहीले. दरम्यान नाट्यमयरित्या पुन्हा भाजपचे सरकार अस्तित्वात आले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रालयातून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी मुख्यमंत्री सहायत्ता निधीच्या चेकवर आपली सही करत या कार्यकाळातील कामाचा श्रीगणेशा केला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती राजवटीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. कोणतेच सरकार अस्तित्वात नसल्याने पर्यायाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी देखील बंद होता. हा कक्ष सुरु करावा यासाठी सर्व पक्षांनी राज्यपालांना निवेदनही केले होते. या सर्व पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हे कार्य निकाली लावले. दादर येथे राहणाऱ्या कुसूम वेंगुर्लेकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत १ लाख वीस हजारांचा सहाय्यता निधी धनादेशामार्फत देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्वत:हा धनादेश कुसूम यांच्या हाती सुपूर्द केला.



भाजपकडून ऑपरेशन देवेंद्र 


महाराष्ट्रात एकिकडे सत्तास्थापनेचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला अतानाच इथे दुसरीकडे भाजपकडून बहुमताचा आकडा गाठण्य़ासाठी राज्यात विशेष ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या मोहिमेला ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव देण्यात आलं आहे. या ऑपरेशनला कोण ऑपरेशन लोटस, तर कोण ऑपरेशन कमळ म्हणूनही संबोधत आहे. 


सत्तास्थापनेच्या गणितात बेरजेच्या राजकारणासाठी चार आमदारांना कामालाही लावण्यात आलं आहे. बहुमताची अग्निपरीक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायची आहे. परिणामी बहुमताचा जादुई आकडा गोळा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि टीम कामाला लागली आहे. महाराष्ट्रातील याच ऑपरेशनला भाजपानं ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार असं नाव दिलं आहे.


अखेरचा प्रयत्न 


राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपच्या पाठिंब्याच्या वाटेवर असणाऱ्या अजित पवार यांच्या मनधरणीचे सर्वतोपरी प्रयत्न सध्या सुरु आहेत. सोशल मीडियापासून ते व्यक्तिगतपणे भेट घेत नेतेमंडळी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय असणारे पवार कुटुंबीय अजित पवार यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. अखेर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आता एक अखेरचा प्रयत्न म्हणून पवारांच्या मनधरणीची जबबादारी आपल्या हाती घेतली आहे. 


सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची माहिती दिली. अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यास त्यांना पक्षाच्या कारवाईला सामोरही जावं लागू शकतं असा आशय पाटील यांच्या वक्तव्यातून पाहायला मिळाला. 


'मी त्यांना यापूर्वीही भेटलो आहे. यानंतरही अंतिमत: त्यांची समजूत घालण्यासाठी जाणार आहे. शेवटी ५४ आमदार कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. यश आलं तर ठीक, नाहीतर पक्षाचा निर्णय सर्वमान्य असेल' असं जयंत पाटील म्हणाले.