Maharashtra Winter Session : 'अध्यक्ष तुम्ही निर्लज्जपणा करु नका' असं विधान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांना निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरुन सभागृहात एकच गदारोळ झाला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यासोबत गिरीश महाजन यांनीही ही मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालतनात मुख्यमंत्र्यांची याबाबत चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पुरवणी मागण्यांवर भाषण करतील असे म्हणताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी हरकतीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चौथ्यांदा सभागृह तहकूब केले असेही विरोधकांनी म्हटले. यावेळी जयंत पाटील यांनी हे बरोबर नाही, तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले.


यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. तसेच राष्ट्रावादीचे धनंजय मुंडे, अजित पवार यांनीही चर्चा केली. जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरु होणार की नाही याबाबत आता शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे निलंबनाची कारवाई होत नाही किंवा ते स्वतः याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरु होणे कठिण दिसत आहे. त्यामुळे याबाबत आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.