मुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
कपील राऊत, झी मीडिया, मुंबई : नागपूरात रविवारी स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणआंचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknah Shinde) यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तसंच मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील (Solar Explosive Company) कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला" अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात (Accident) झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांना समजलं. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वॅगनआर कारनेही येऊन धडकली. कारमधले काही जण या अपघातात जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.
या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या तरुणाचे नाव गिरीश केशरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी इथला रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत.
या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत असून त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.
नागूपरमध्ये भीषण स्फोट
नागपूर सोलर इंडस्ट्रीतील स्फोटात 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. काल सकाळी पहिली शिफ्ट सुरू असताना हा अपघात झाला त्यात आरती निळकंठ सहारे या 20 वर्षीय तरुणीही ठार झाली. ती नागपूरच्या काटोल तालुक्यातील कामठी मासोदची रहिवासी होती. तिच्या कुटुंबासाठी ती एकटी आधारस्तंभ होती. तिचे आई वडील दिव्यांग आहेत.