...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं
Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.
Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: नंदूरबारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंचं वेगळं रुप पाहायला मिळालं. येथील धडगावमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या आदिवासी मेळाव्यासाठी श्रीकांत शिंदे हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रमानंतर पुढील नियोजित कार्यक्रमासाठी श्रीकांत शिंदे धुळ्याला निघाले. मात्र श्रीकांत शिंदे हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर मेळाव्याला हजेरी लावलेल्या काही विद्यार्थ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली. या गर्दीतील विद्यार्थ्यांना घेऊन श्रीकांत शिंदेंनी चक्क एक फेरफटका मारुन आणला. यासाठी त्यांनी आपल्याबरोबर असलेल्या शिंदे गटातील 2 मंत्र्यांना काही काळ हेलिकॉप्टरमधून खाली उतरण्याची विनंती केली. या मंत्र्यांनीही ही विनंती मान्य करत आदिवासी विद्यार्थ्यांना या अनोख्या हवाई सफरीचं गिफ्ट देण्यात हातभार लावला.
हेलिकॉप्टरची प्रचंड क्रेझ
महाराष्ट्रातील आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा समावेश होतो. आदिवासीबहुल भाग असलेल्या या जिल्ह्यामध्ये सामान्यपणे अशापद्धतीने एखादा राजकीय नेता किंवा सेलिब्रिटी आल्यानंतरच प्रत्यक्षात हेलिकॉप्टर पाहण्याची संधी स्थानिकांना मिळते. त्यामुळेच या दुर्गम भागामध्ये अशाप्रकारे प्रत्यक्ष हेलिकॉप्टर पाहावयास मिळाल्याचा वेगळाच आनंद या मेळावाला आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर होता. बरं इथं हे हेलिकॉप्टरची क्रेझ केवळ मुलांमध्येच नाही तर सर्वांमध्येच दिसून येते. म्हणूनच तालुक्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी एखादा नेता किंवा अती महत्त्वाची व्यक्ती हेलिकॉप्टरने आली की ते हेलिकॉप्टर पाहण्यासाठी त्या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं गर्दी करतात. गुरुवारी धडगावमध्येही असाच प्रकार घडला. पुढील नियोजत कार्यक्रम असल्याने खासदार शिंदे हेलिकॉप्टरमधून आदिवासी मेळाव्यासाठी आले.
मोठी गर्दी
कार्यक्रम आटपून खासदार शिंदे निघाले असता हेलिकॉप्टर पाहण्यासाठी काही मुलांनी त्याच्या आवतीभोवती गर्दी केली होती. ही गर्दी पाहून खासदार शिंदेंनी चक्क आदिवासी मुलांची केवळ हेलिकॉप्टर पाहण्याची नाही तर त्यामधून फेरफटका मारण्याची हौस पूर्ण केली. श्रीकांत शिंदे स्वत: हेलिकॉप्टरमध्ये बसलेले असताना त्यांनी काही स्थानिक मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून फिरवून आणले.
दोन्ही मंत्र्यांना उतरवलं
नंदूरबारमधील आपल्या दौऱ्याची सांगता करुन खासदार शिंदे धुळ्याकडे रवाना होण्यासाठी निघाले होते. त्यावेळी शिंदेंना हेलिपॅडजवळ काही लहान मुलं हेलिकॉप्टरकेड फारच उत्सुकतेने पाहताना दिसली. या चिमुकल्यांना फिरवून आणण्याचा विचार श्रीकांत शिंदेंच्या मनात आला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात अंमलात आणला. खासदार शिंदेंनी त्यांच्याबरोबर आलेले कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि उदय सामंत यांना हेलिकॉप्टरमधून उतरवून थोडा वेळ खाली थांबण्याची विनंती केली. खासदार शिंदेंनी या दोन्ही महत्त्वाच्या मंत्र्यांना अचानक हेलिकॉप्टरमधून का उतरवले, हे तिथे उपस्थित असलेल्या इतरांना समजलं नाही. या तिन्ही नेत्यांमध्ये काही बेबनाव झाला की इतर काही कारण आहे हे कळेपर्यंत खासदार शिंदे आणि 6 आदिवासी मुलांसहीत हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं. काही वेळाने पुन्हा खासदार शिंदेंचं हेलिकॉप्टर याच हेलिपॅडवर उतरलं. पटापट या हेलिकॉप्टरमधून 6 मुलं खाली उतरली. हेलिकॉप्टरमधून फेरी मारुन आल्याचा आनंद या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
ही 6 मुलं हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यानंतर मंत्री भुसे यांनी सर्व मुलांना चॉकलेटचं वाटप केलं. त्यानंतर दोन्ही मंत्री आणि खासदार शिंदेंनी धुळ्याकडे उड्डाण केले. मात्र खासदार शिंदेंच्या या कृतीची चर्चा धडगावमध्ये चांगलीच रंगल्याचे पाहण्यास मिळाले.