‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे`
राष्ट्रपती पदक, शौर्य, प्रशंसनीय सेवा पदक जाहीर
मुंबई: ‘महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
विजेत्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस पथकाचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले.
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्र्यालयाकडून शौर्य पदक विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलालाल सर्वात वरचं स्थान मिळालं आहे. तर, दुसऱ्या स्थानावर CRPF आहे. या यादीत उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरं स्थान मिळवलं आहे.