पुणे : पोलीस महासंचालकांच्या ३ दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले आहेत. त्यावेळी लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे स्वागत केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मोदींचं स्वागत केल्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईला तर देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रोटोकॉलनुसार भेट झाली, यादरम्यान त्यांच्यात काहीसं बोलणंही झालं, असं वक्तव्य भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केलं आहे.


पंतप्रधान येण्यापूर्वी तसंच पंतप्रधान गेल्यानंतर  मुख्यमंत्री आणि फडणवीस विमानतळाच्या व्हीआयपी कक्षात एकत्र होते. तिथे त्यांच्यात काही वेळ बोलणं झालं, असं काकडे म्हणाले. तसंच या सरकारला सध्या तरी काही धोका नाही, हे सरकार दीर्घकाळ चालेल. हे सरकार चालायला पाहिजे असं वाटतं. १९८० मध्ये शरद पवारांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून स्थिर सरकार दिलं होतं, अशी प्रतिक्रिया काकडेंनी दिली.


अजित पवारांना लगेच उपमुख्यमंत्रीपद देतील, असं वाटत नाही, असं भाकीतही काकडेंनी वर्तवलं. आमच्या पक्षात फक्त खडसे नाराज आहेत. ते त्यांच्या मुलीला निवडून आणू शकले नाहीत. खडसे भ्रमिष्ट वातावरण निर्माण करत आहेत, अशी टीका संजय काकडेंनी केली.