मुंबई : माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेकडील डाव्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार होते. मात्र, भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्याने याचे उद्घाटन रद्द करण्यात आले. परंतु मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्देश दिलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच इतर लोकप्रतिनिधी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत दुपारी दीड वाजता हे लोकार्पण ठरले होते. त्याप्रमाणे एमएमआरडीएने आवश्यक ती तयारीही केली होती. मात्र पहाटे भिवंडी येथे इमारत दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी भिवंडी येथे धाव घेतली आणि मदतकार्य वेगाने सुरू झाले, त्यानंतर हा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएला दिले.


मुंबई- नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या ठाणे दिशेने डाव्या मार्गिकेचे लोकार्पण काल करण्यात येणार होता. परंतु केवळ अधिकृत उदघाटन झाले नाही म्हणून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवणे आणि वाहनधारकांची गैरसोय करणे बरोबर नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला उद्घाटननाची वाट न पाहता पुलाची मार्गिका खुली करून वाहतूक सुरू करण्यास सांगितले.


माणकोली उड्डाण पूलाच्या एका बाजूने  वाहतूक सुरू झाली आहे. हा पूल सुरु झाल्याने ठाणे-भिवंडी बायपासवर होणारी कमालीची वाहतूक कोंडी आता कमी होण्यास मदत होणार आहे. या पुलावरून वाहतूक सुरु झाल्याने नाशिककडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा वाहतूक कोंडीमुळे मोडणारा किमान अर्धा तास वाचणार आहे.