सभागृहात आपण एकत्र राहिले पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना आवाहन
विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली.
नागपूर : 'समोरची लोकं आपल्याला पावलोपावली अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. पावलावर पाऊल टाकण्याऐवजी पायात पाय अडकवण्याची त्यांना सवय आहे.त्यामुळे सावध रहायला हवं' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत ते बोलत होते. विधानभवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व मंत्री आणि आमदार बैठकीला उपस्थित होते.
काल त्यांना (विरोधकांना) एकदम सावरकरांचे प्रेम उफाळून आले पण अर्धवट सावरकर स्वीकारू नका. हे विषय सभागृहाबाहेरचे आहेत. सभागृहात आपण एकत्र राहिले पाहिजे असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
सभागृहात काय करायचे ते तुम्हाला सांगितले आहे पण माझ्यासमोर बाहेरचंही आव्हान आहे. आज देशात अराजकता आहे. त्याचे महाराष्ट्रात पडसाद पडू नये याची काळजी घ्यायला हवी. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी काय करायचं आहे. काय करता येत नाही म्हणून वातावरण बिघडवलं जातंय पण आपण वातावरण बिघडू न देणं महत्वाचं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देशातील वातावरण लक्षात घेता आपल्या मतदारसंघात काही होणार नाही याची काळजी घ्या असेही ते म्हणाले.
मागच्या सरकारने विदर्भाला फसवलं घोषणा केल्या पण काम केलं नाही. - विदर्भाच्या हिताचा आपण प्रस्ताव मांडला आहे. पुरवणी मागणी वेळी सगळ्यांनी सभागृहात असले पाहिजे असे राष्ट्रवादी विधिमंडळ नेते जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले. अधिकारी, कर्मचारी बदलीसाठी येतात त्यात आमदारांचा वेळ जातो, सभागृहात कामकाज जास्त प्राधान्य द्यावे ते महत्वाचे असल्याचेही पाटील म्हणाले. मंत्री कोणत्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही. समोरचे काही बोलले तर ते खपवून घेता कामा नये. आपण आक्रमक राहिले पाहिजे असे आवाहन पाटलांनी केले.
सभागृहात कुठल्या पक्षाचा मंत्री अडचणीत येतो असं लक्षात आलं तर तीनही पक्षांच्या आमदारांनी एकत्र येऊन त्याच्या पाठिशी उभं रहावं असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.