नाशिक : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं ठरलंय असं सांगितलं असलं तर भाजप शिवसेनेत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण याचा वाद काही मिटलेला नाही. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच मोठा भाऊ असून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केलाय. तर आमचं ठरलंय दुसऱ्यांनी त्यात नाक खूपसू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी महाजनांना लगावला आहे.


आम्हीच शिवसेनेला मदत केली!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा लढताना भाजपच्या जागा निवडून द्या असच आम्ही म्हणालो नाही. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत होती, त्याठिकाणी आमची भाजपची टीम होती.आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावी, अशी आहे. मोठ्या भावाची आमची भूमिका आहे. निकाल राज्यातले बघितले तरी कोणाचा मुख्यमंत्री असावा, हे सांगण्याची गरज नाही, असे गिरीश महाजन म्हणालेत.


चंद्रकात पाटील-दानवेंची सारवासारव


दरम्यान वाद वाढू नये म्हणून चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली आहे. भाजपा आणि शिवसेना विधानसभेतही एकत्र लढणार असून लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळवणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.


आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, ही कोणत्याही कार्यकर्त्याची इच्छा असते. पण मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शाह निर्णय घेतील. मुख्यमंत्री कोणाचा? अडीच-अडीच वर्ष का पाच वर्ष याचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची आहे हे अमित शाह यांनी सांगितल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.