धुळे : खान्देशातील तीनही जिल्ह्यातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर आला आहे. जळगाव जिल्ह्यातलं या हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय. जळगावचा पारा 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. जळगाव शहराचं तापमान हे उन्हाळ्यात 45 अंश सेल्सियसच्यावर असतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर धुळे जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक कमी तापमान 10.04 सेल्सियस नोंदवला गेलाय. नंदुरबार जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असताना अचानक तापमानाचा पारा खाली आल्याने थंडीची हुडहुडी चांगलीच वाढलीय. 


या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. तर वाढत्या थंडीमुळे शहरी भागातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झालंय. खान्देशातील कसमादे पट्टा म्हणजेच, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तसेच नाशिक शहरालाही चांगलीच हुडहुडी भरली आहे.


खान्देशात यापूर्वी पिकांचं खूप नुकसान झालं आहे, त्यामुळे रब्बीचा हंगाम चांगला येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, पण काही दिवसांपूर्वीच खान्देशातील काही भागात रिमझिम पाऊस झाला आहे. खान्देशात थंडीचा जोर वाढल्यानंतर भरीत पार्ट्या रंगू लागतात. विशेष म्हणजे जळगाव आणि धुळे जिल्ह्यात या पार्ट्या होतात.