शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार उघड
औरंगाबादमध्ये महाजेनकोचं हायटेक कॉपी प्रकरण ताजं असतानाच आणखी एक सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी भालगावंच्या शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी छापा टाकत हा सगळा प्रकार उद्धवस्त केलाय.
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महाजेनकोचं हायटेक कॉपी प्रकरण ताजं असतानाच आणखी एक सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील निपाणी भालगावंच्या शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी छापा टाकत हा सगळा प्रकार उद्धवस्त केलाय.
औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेज. या कॉलेजमध्ये पॉलिटेक्निक थर्ड इअर आणि बी.फार्मसी सेंकड इयरचा पेपर सुरु होता. हाच पेपर सोडवण्यासाठी कॉलेजबाहेरुन सुरु होता कॉपी पुरवण्याचा गोरखधंदा. काही विद्यार्थी पेपर सोडवताना मोबाईल घेऊन गेले आणि प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून मोबाईल बाहेर पाठवला. ते प्रश्न पाहून कॉलेजबाहेर कारमध्ये बसलेले विद्यार्थी पुस्तकातून त्याचे उत्तर कापून ती चिठ्ठी आतमध्ये पाठवत होते.
हा सर्व प्रकार अगदी शांतपणे सुरु होता. मात्र पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकत हा सर्व प्रकार उधळून लावला. या प्रकरणात पोलिसांनी ५ विद्यार्थी आणि एका पालकालाही अटक केलीये. कॉलेजचे संस्थाचालक मात्र हा सगळा प्रकार बाहेर सुरु होता आणि चौकशी करु असं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न करतायत.
या प्रकरणी पोलिसांनी काही मोबाईल सुद्धा जप्त केलेत. पेपर झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा पेपर बाहेर पाठवणा-या आणखी दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॉलेजच्या सहभागाशिवाय हा प्रकार शक्य नसल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.
या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील कॉपी करणा-या रिअल मुन्नाभाईंचा पर्दाफाश झालाय. ग्रामीण भागात असे प्रकार सर्रास उघडपणे वारंवार समोर येतात. मात्र हे प्रकार थांबवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही हेच दुर्दैव म्हणावं लागेल.