सिंधुदुर्ग : शिवसेनेवर आम्ही टीका करणार नाही, हा आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शब्द दिला आहे. हा दिलेला शब्द पाळून एक पाऊल पुढे टाकले आहे. आता बघू ? कटुता टाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आता चेंडू शिवसेनेकडे आहे. टीका करायची की नाही हा निर्णय शिवसेनेने घ्यावा, अशी मिश्कील प्रतिक्रिया कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राणे वादावर मोठे  भाष्य केले. मी हा वाद संपविण्यास सांगितले आहे. हा वाद किती काळ चालणार? बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला आदर आहे ना? मग पुढे वाद कशाला? मी नारायण राणे तसेच नितेश यांना सांगितले आहे की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करु नका. आता हा वाद संपवून टाका. आता जमले नाही तर दिवाळीनंतर हा वाद संपवून टाका, असे त्यांना मी सांगितले आहे. त्यांनी मला तसा शब्द दिला आहे. ते यापुढे हा वाद संपवतील, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली. 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केले. त्यामुळे राणे आता हा वाद संपवतील अशी आशा होती. त्यादृष्टीने नितेश राणे यांनी पुढाकार घेत यावर भाष्य केले आहे.


नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळत असल्याचे दाखवून देत माघार घेतल्याची दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात राणे - शिवसेना वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचा पक्ष प्रवेश कधी? प्रवेशाची तारीख जाहीर होते आणि राणे यांचा प्रवेश लांबतो, असे वारंवार होत आहे. शिवसेनेचा विरोध होत असल्याने राणेंचा प्रवेश लांबत आहे का? यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. नारायण राणे यांच्या प्रवेशाचा प्रश्नच नाही. ते भाजपचे अधिकृत राज्यसभेतील खासदार आहेत. राहता प्रश्न त्यांच्या मुलाचा होता. तोही सुटलेला आहे. त्यांनी कणकवलीत प्रवेश केला आहे. ते भाजपचेच आहेत. त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न कुठे येतो, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


दरम्यान, मुख्यमंत्री कोकणात प्रचाराला जाणार आहेत. कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्यासाठी प्रचार सभेला जाणार आहे, पण या सभेत शिवसेनेवर टीका करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. मुख्यमंत्री कणकवलीमध्ये प्रचारसभा घेणार नाहीत, असा दावा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला होता, पण मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.