देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. कचरा जाळणाऱ्यांविरोधात उपद्रव शुल्क आकारून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्याची तक्रार “मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६-८१६९७” या मदत सेवा क्रमांकावर नोंदवावी. तसेच, सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून निरनिराळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये परिणामकारक अशी विविध कामे होत आहेत. उपाययोजना पलीकडे जावून वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवरही सक्‍त कारवाई केली जात आहे.


महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण, व वातावरणीय बदल विभाग यांच्या मार्फत दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राबवायची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. त्यातील अनुक्रमांक ९ मधील निर्देशांचे अनुपालन करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “Chief Minister Clean Mumbai Helpline: 81696-81697” या व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावरील तक्रार सादरीकरणाच्या टॅब मध्ये “कचरा जाळणे”/“Burning of Garbage” हा विकल्प अद्ययावत करण्यात आला आहे.


उघड्यावर कचरा जाळणे, हा पर्यावरणविषयक कायदे आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे. त्यासाठी कायद्यात कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, नागरिक अनेकदा उघड्यावर कचरा जाळून विल्हेवाट लावतात आणि पर्यायाने कायद्याचे उल्लंघन करतात. कायद्यानुसार उघड्यावर कचरा जाळणे हे उपद्रवी कृत्य म्हणून गणले जाते. मात्र आता उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे. 


उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या की, मुंबई महानगर व परिसरात वायू प्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्याची तक्रार “Chief Minister Clean Mumbai Helpline: 81696-81697” या व्हॉट्सॲप सेवा क्रमांकावर ताबडतोब नोंदवावी. सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहनही उप आयुक्त जाधव यांनी केले आहे.