मुंबई : राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जोरदार तडाखा दिला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही पावसाने जोरदार तडाखा दिला. परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना हे आदेश दिलेत. परतीच्या पावसाचा मराठवाडा, विदर्भाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. एक ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे आदेश दिले आहेत. अर्थात पंचनामे आणि मदत करण्याचे आदेश मावळते मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असले तरी नुकसान झालेल्यानं विशेष नुकसान भरपाई जाहीर केली जाते का, नव्या सरकारचा शपथविधी झाल्यावर नवे सरकार नुकसानभरपाईबाबत काही वेगळं पाऊल उचललं जातं, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


कोकणात शेतीचे मोठे नुकसान


ऐन भातकापणीच्या वेळी पडत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. तळकोकणातल्या ९९८५ हेक्टर भातशेतीचं पुरामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. यात २८ हजार ७६० शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे कोकणातला शेतकरी रडकुंडीला आला आहे. उस्मानाबादमध्ये परतीच्या पावसाचा सोयाबीनच्या पिकांवर परिणाम झालाय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन काळं पडले आहे. त्याला कोंब फुटू लागलेत. 


विदर्भात सोयाबीन, तूर, कापसाचे नुकसान


विदर्भातही पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वर्धा जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस आणि भाजीपाल्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गेल्या दशकात कापूस उत्पादक समजल्या जाणाऱ्या विदर्भात कापसाला पर्यायी पिक म्हणून सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या नगदी पिकाची राखरांगोळी केली आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका सटाणा तालुक्यातील आर्ली द्राक्ष उत्पादक शेतकऱयां बसला आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष घडाला तडे गेले तर  पावसाने द्राक्षांचा अक्षरशः शेतात खच पडला आहे. सर्वत्र द्राक्षांचा चिखल झाला आहे. तसंच भुईमूग, सोयाबीन कांदापिकांची ही अवस्था फारशी चांगली नाही.


पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव 


धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त कापूस पिकाला सततच्या पावसाचा फटका बसलाय. या दोन्ही जिल्ह्यात अति पावसामुळे पिकांची नासाडी झालीय.  काढणीला आलेल्या कापसाचं सर्वाधिक नुकसान झाले. त्यातच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. जुन्नर येथे परतीच्या पावसाने खरीप हंगामाची काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. पिकं पाण्याखाली गेली आहे तर शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुसकान झालंय. मोठ्या भांडवली खर्चातून उभ्या केलेल्या पिकांचे आता डोळ्यासमोर नुकसान होत आहे.  त्यामुळे  सरकारने मदतीचा हात पुढे करण्याचे मागणी शेतकरी करत आहेत.


जळगावात पिकांना पावसाचा जोरदार फटका


गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे कांग नदीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलंय. अनेकांच्या घरांची पडझड झालीय. यामुळे अनेक रहिवाशांच्या संसारोपयोगी वस्तुंचं नुकसान झालंय. नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी शेकडो नागरिकांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमधील घराला घेराव घातला. वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांना पावसाचा जोरदार फटका बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. सोयाबीन, तूर, कापूस आणि भाजीपाल्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


वाशिम जिल्ह्यातील पिकांचं नुकसान


गेल्या दशकात कापूस उत्पादक समजल्या जाणाऱ्या विदर्भात कापसाला पर्यायी पिक म्हणून सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलाय. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या नगदी पिकाची राखरांगोळी केलीय. पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय. हा सोयाबीन काढणीचा हंगाम आहे. जिल्ह्यातील ८० टक्के सोयाबीनची काढणी झालीय.. मात्र, सततच्या पावसामुळे उर्वरित सोयाबीन काढणीसाठी शेतात जाणं कठीण होतंय. मालेगाव तालुक्यातील मेडशी, मुंगळा राजुरा,गावासह अनेक गावातील सोयाबीनच्या शेतात पाणी साचल आहे. तर काही सोयाबीन काढणी केलेल्या सोयाबीनला अंकुर फुटत आहेत.. ऐन दिवाळीच्या दिवसात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झालाय..जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात सर्वाधिक पीक नुकसान झालंय.. तर कपाशी, तूर आणि ज्वर या पिकावरही पावसाचा फटका बसलाय..अद्याप नेमकं किती नुकसान झालं हे पंचनामा झाल्यावरच कळेल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिलीय.


यवतमाळ येथे फुलांचे भाव गडगडलेत


यवतमाळच्या बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यांवर आज सकाळी फुलांचा खच पडला होता. दिवाळी निमित्तानं फुलविक्रेते शेतकरी शहरात फुलांचे ढीग घेऊन बसले मात्र फुलांचे भाव गडगडले आणि दोन दिवस पाऊस कोसळल्याने फुलं भिजली, आणि विक्री घटली त्यामुळे फुलांचे ढीग रस्त्यावर असेच भिजत पडले, यवतमाळ च्या दत्त चौक, तहसील चौक, भाजी मंडी, आर्णी रोड, स्टेट बँक चौकात जागोजागी असा फुलांचा खच साचलेला होता. सडलेल्या फुलांतून दुर्गंधी पसरू नये म्हणून नगर परिषद स्वच्छता विभागाने अखेर ह्या फुलांची विल्हेवाट लावली.