साताऱ्यात काँग्रेसला झटका, माजी आमदार भाजपात दाखल
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साताऱ्यात काँग्रेसला धक्का बसला आहे. माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने भोसले भाजपच्या गळाला लागले. सातारा जिल्ह्यातल्या भुईंजमध्ये डिस्टिलरी प्रोजेक्टच्या उदघाटनाच्या कार्यक्रमातच भोसलेंनी भाजपात प्रवेश केला. यावेळी मदन भोसेल हे भाजपचे भावी आमदार असल्याचे सूचक व्यक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले.
राष्ट्रवादीचे राजेंना अभय
तर दुसरीकडे राष्ट्रवादीने संमजस्याने घेत आपले साताऱ्यातील वर्चस्व राखले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघातून अखेर उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. या बैठकीत शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नेत्यांमधील सर्व वाद संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचा उदयनराजे भोसले यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यानस स्थानिक नेत्यांशी फटकून वागत असल्यामुळे उदयनराजे यांना साताऱ्यातून पुन्हा उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा जोरदार विरोध होता. त्यामुळे उदयनराजे विरोधी गटाने सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी उचलून धरले होते. यानंतर उदयनराजे भोसले यांनीही दगाफटका झाल्यास बघून घेईन, असा इशारा दिला होता.