काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अखेर भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया दिली जात असून, नाना पटोले (Nana Patole) यांनी तर निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र पक्षाला आरसा दाखवला आहे. अशोक चव्हाणांना सांभाळण्याची जबाबदारी फक्त आपली होती असं ते म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय निरुपम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "अशोक चव्हाण नक्कीच पक्षासाठी अमूल्य होते. कोणी त्याला उत्तरदायित्व म्हणत आहेत, कोणी ईडीला जबाबदार धरत आहे. पण या सर्व घाईत देण्यात आलेल्या प्रतिक्रिया आहेत". 


पुढे गौप्यस्फोट करत त्यांनी सांगितलं आहे की, "मुळात महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीवर ते खूप नाराज होते. त्यांनी नेतृत्वाला यासंबंधी वारंवार माहिती दिली होती. जर त्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतलं असतं तर ही वेळ आली नसती". संजय निरुपम यांनी यावेळी त्या नेत्याचं नाव घेणं मात्र टाळलं. 


"अशोक चव्हाण हे साधनसंपन्न, कुशल संघटक, तळागळासी जोडलेले आणि गंभीर नेते आहेत. भारत जोडो यात्रा गतवर्षी नांदेडमध्ये 5 दिवस असताना, सर्वांनी त्यांची क्षमता अनुभवली होती. त्यांनी काँग्रेस सोडणं आपल्यासाठी मोठं नुकसान आहे. कोणीही याची भरपाई करु शकत नाही. त्यांनी नीट सांभाळण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त आमचीच होती".



"निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते"


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर टीका केली आहे. "भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपात दाखल झाले. आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पुजनीय वाटू लागले ?निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते," अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 


"गेल्या 38 वर्षाच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे"


दरम्यान अशोक चव्हाण यांनी आज देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. "सर्वात आधी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे की, आमचे एकमेकांविषयी असलेले संबंध आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे. गेल्या 38 वर्षाच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे. पंतप्रधान मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन या देशामध्ये चांगले काम करता आले पाहिजे. देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान दिलं पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून मी आज प्रवेश करत आहे," असं यावेळी ते म्हणाले.