पंकजा यांचा धनंजय यांना दे धक्का, प्रा. मुंडे समर्थकांसह भाजपात
पंकजा मुंडे यांनीही जोरदार खेळी भाऊ धनंजय मुंडे यांना दुसरा धक्का दिला आहे.
बीड : विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांनीही जोरदार खेळी करत आधी राष्ट्रवादीचा जाहीर झालेला उमेदवार पक्षात घेतला. आता तर त्यापुढे पाऊल टाकत काँग्रेसचे नाराज नेत्याला घेत थेट राष्ट्रवादीचे नेते आणि भाऊ धनंजय मुंडे यांना दुसरा धक्का दिला आहे. काँग्रेसचे नेते प्रा. टी. पी. मुंडे यांनी आपल्या समर्थकांसह आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीत हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते म्हणून कार्यरत असणारे टी. पी. मुंडे हे भाजप प्रवेश करणार अशी चर्चा होती. परळीची जागा ही काँग्रेसकडे असताना दोन निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने टी. पी. मुंडे नाराज होते. ही नाराजी काँग्रेला ऐन निवडणुकीत महागात पडली आहे.
स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, असे सांगत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.