`कामं होत नाहीत, मान राखला जात नाही`, काँग्रेस आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्र्यांसमोरच वाचला तक्रारींचा पाढा
राजुरा : महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदारांची काम होत नाहीत, तसंच मानही राखला जात नाही, अशी तक्रार काँग्रेस आमदाराने केली आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी ही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री आणि आमदार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा होत असताना आमदार धोटे यांनी ही तक्रार केली.
काँग्रेस आमदारांची काम होत नसतील, तर लोकांना काय तोंड देणार? असा प्रश्नही सुभाष धोटे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मंत्र्यांसह महाविकासआघाडीच्या आमदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी सुभाष धोटे यांनी युती सरकारच्या काळात झालेली कामं आणि आता नवीन सरकारमध्ये होणाऱ्या धोरणात्मक निर्णय होत आहेत, या सगळ्या तक्रारींचा पाढा वाचला.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुभाष धोटे यांची नाराजी जास्त दिसून आली. कारण या भागतल्या दोन नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहेत. नगरविकास खात्याकाडे काही कामं अडली होती. ही कामं जानेवारी फेब्रुवारीपासून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात अडली आहेत, असा आरोप सुभाष धोटे यांचा होता.
दरम्यान सुभाष धोटे यांनी केलेल्या आरोपांबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
'महाविकासआघाडी'त पुन्हा नाराजी, काँग्रेस मंत्र्याने केलेल्या नियुक्त्यांना शिवसेना-राष्ट्रवादीचा विरोध