मुंबई : महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असला तरी मंत्रिपद न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिनही पक्षांमधील मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी समोर आली आहे. त्यात आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील हे पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्यकर्ते हे देखील नाराज असल्याने त्यांनी ही राजीनामा देण्य़ाची मागणी केली आहे. पी एन पाटील समर्थकांच्या मेळाव्यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर झाला असून आता आमदार पी एन पाटील राजीनामा देणार का याकडे लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूरचे सतेज पाटील यांना स्थान देण्यात आल्याने पी एन पाटील समर्थक नाराज आहेत. सोशल मीडियावर कार्यकर्ते आपला राग व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक वर्षात पक्षाची एकनिष्ठ असूनही मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना देखील मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल काँग्रेस कार्य़ालयात तोडफोड केली होती. 


महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर इच्छुकांची नाराजी उफाळून आली आहे. या आमदारांची समजूत काढताना नेत्यांची पुरती दमछाक होतांना दिसत आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिपदाची आशा बाळगून असलेले अनेक नेते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नाराजांचे प्रमाण जास्त आहे. माजलगावचे राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळुंके चौथी टर्म असतानाही डावलण्यात आल्याने नाराज होते. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी केली होती. मंगळवारी सकाळपासून धनंजय मुंडे, अजित पवार आदी नेते त्यांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात होते. अखेर दुपारी प्रदेशाध्यक्ष आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सोळुंके यांचे समाधान झाले.