अकोला :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. ही नाराजी त्यांनी एका कार्यक्रमात उघडपणेही बोलूनही दाखवली होती. या नाराजीनंतर आता त्यांना अन्य पक्षांच्या ऑफर येत आहेत. अशीच एक ऑफर त्यांना काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही ऑफर नितीन गडकरी (Nitin Gadkari) स्विकारतात का याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींची (Nitin Gadkari) भाजपामध्ये घुसमट होत असल्यास काँग्रेसमध्ये यावं, आम्ही त्यांची साथ देऊ, अशी ऑफर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यांना दिली आहे.अकोल्यात पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी ही ऑफर गडकरी यांना दिली आहे.  


नाना पटोले (Nana Patole)  पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नितीन गडकरी पक्षावर नाराज आहेत. आम्ही त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण देतो. ते आमच्यासोबत आले तर, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ,असा विश्वास पटोल यांनी व्यक्त केला आहे.तसेच केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यावर ईडी-सीबीआय लादण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याचं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला होता. 


काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष आहे. यामध्ये कोणत्याही पदाधिकाऱ्याला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण भाजपमध्ये तसे नाही, अलीकडे नितीन गडकरी यांची पक्षात ज्या प्रकारे अवस्था झाली आहे, ते योग्य म्हणता येणार नाही, असेही पटोले (Nana Patole)  यांनी म्हटलेय.  


पटोले पुढे म्हणाले की, आम्ही नितीन गडकरी यांची लवकरचं भेट घेणार आहोत. आणि यासंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत. 
गडकरी काँग्रेसमध्ये आले तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले आहेत.  


दरम्यान काही दिवसांपुर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी (Nitin Gadkari)  यांनी वगळण्यात आले होते.तसेच देशात भाजपाविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या आरोपानंतर गडकरी पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातंच आता नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिलीय. नितीन गडकरी व भाजप नेते या ऑफरवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.