काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार
दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार आहे. त्यामुळे काहीजणांनी भाजपशी संपर्क वाढविला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत.
नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक
स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने या नगरसेवकांची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घडवून आणली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले असले तरी, अद्याप सांगली महापालिकेवर मात्र झेंडा फडकविता आलेला नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादीचाच वरचष्मा
महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहिला आहे. यंदा भाजपने महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गेल्या वर्षभरापासून नियोजनबद्धरित्या भाजपची वाटचाल सुरू आहे.