पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीत पुण्यातील जागा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी लढवावी अशी ईच्छा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांची होती. यासाठी इथली जागा राष्ट्रवादीने लढवावी असा आग्रह करण्यात येत होता. पण नुकत्याच झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जागावाटप बैठकीत काँग्रेसला जगावाटपात पुण्याची जागा राखण्यात यश आले आहे.  शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीमध्ये पुण्याच्या जागेवरील हट्ट सोडल्याचे सांगण्यात येत आहे.


कार्यकर्त्यांची ईच्छा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वाट्याला होता. पण शरद पवारांनी पुण्याच्या या जागेतून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादीतील नेते आणि कार्यकर्त्यांची ईच्छा होती. ही जागा शरद पवार लढणार म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. पण शरद पवार निवडणूक लढण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा हट्ट अखेर राष्ट्रवादीने सोडला आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी या संदर्भातील माहिती 'झी 24 तास' ला दिली.


सहा जागांवरून रस्सीखेच 


या निर्णयामुळे पुण्याच्या जागेचा तिढा सुटला असला तरीही सहा मतदारसंघावरून दोन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. नगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.