प्रणव पोळेकर, रत्नागिरी : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी रत्नागिरीच्या राजापूर नगरपरिषदेत मात्र बिघाडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं इथं चक्क भाजपच्या साथीनं शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजापूर नगरपरिषदेत आघाडीत बिघाडी झाली आहे. समिती सभापती निवडीत शिवसेना बॅकफूटवर गेली.


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर भलतीच राजकीय समीकरणं आकाराला येतात. राजापूर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत तेच पाहायला मिळालं. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं भाजप नगरसेवकाला हाताशी धरून शिवसेनेला धोबीपछाड केलं. या निवडणुकीत परवीन बारगीर आणि स्नेहा कुवेस्कर या आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली.


राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीला दिले होते. मग स्थानिक पातळीवर वेगळाच खेळ कसा रंगतो, असा प्रश्न राजापूरमधील शिवसेना नेत्यांना पडला आहे.


राज्यातली समीकरणं वेगळी आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं... हेच चित्र राजापूरमध्ये दिसलं. नजीकच्या भविष्यात हा राजापूर पॅटर्न आणखी काय वळण घेतो, याकडं आता लक्ष लागलं आहे.


प्रणव पोळेकर, झी मीडिया, राजापूर