अहमदनगर: राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांचे सोमवारी पहाटे संगमनेरमधील राहत्या घरी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. खताळ यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता प्रवरा नदी तीरावरील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी.जे. खताळ यांचा जन्म १६ मार्च १९१९ रोजी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे झाला. त्यांचे शिक्षण धांदरफळ, संगमनेर, बडोदा आणि पुणे याठिकाणी झाले. सन १९४३ ते १९६२ या काळात त्यांनी वकिलीच्या क्षेत्रातही चांगलाच दबदबा निर्माण केला होता. १९५२ साली त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली. या निवडणुकीत कम्युनिस्ट नेते दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यानंतर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले.


मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए. आर. अंतुले,  बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे,  कृषी,  नियोजन,  सहकार, अन्न व नागरी पुरवठा,  विधी व न्याय,  प्रसिद्धी, माहिती, परिवहन आदी खात्यांचे मंत्रिपद त्यांनी भूषविले होते. त्यांनी या प्रत्येक खात्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप टाकली. त्यांच्या काळात राज्यात सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली. कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्याचे चासकमान, वर्ध्यातील अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरी आणि राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे कामही त्यांच्या काळात झाले. 


वयाच्या ६५ व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेने निवृत्ती घेतल्यावर योगा,  प्राणायाम,  विपश्यना, चिंतन,  मनन यात स्वतःला गुंतवून घेतले होते. वयाच्या ९३ वर्षी लिहायला सुरुवात केली आणि पुढील आठ नऊ वर्षात सात पुस्तके लिहिली.