अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये सध्या एका मिशीचं महाभारत रंगलंय. केशकर्तनालयात न विचारताच मिशी उडवल्याचा वाद थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आहे. ग्राहकाने मिशी हा थेट जातीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिळदार मिशा हा अनेकांचा अभिमानाचा मुद्दा आहे. अगदी सेलिब्रिटीही मिशीप्रेमातून सुटलेले नाहीत. असेच एक मिशी प्रेमी आहेत नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान येथील किरण ठाकूर. कन्हान गावात मुछे हो तो किरण ठाकूर जैसी असं त्यांचे मित्र अभिमानाने सांगायचे. किरण ठाकूर यांनी आपली ही मिशी प्राणपणाने जपली होती. अगदी रोज मिशीला तेलपाणी करायचे. मिशीला आकार देणे. तिची निगा राखणे हे अगदी ठरलेलं. पण दोन दिवसांपूर्वी कन्हानच्या फ्रेंड्स जेन्टस पार्लरमध्ये ते गेले. तिथे त्यांच्या मिशीवरच संक्रांत आली. कारागिराने न विचारताच मिशीवरून वस्तरा फिरवला. 


मात्र किरण ठाकूर यांचे हे आरोप केशकर्तनालयाच्या मालकाला अमान्य आहेत. जोपासलेली मिशी उडवली जाणं हे दुःख ठाकुरांना आणखी एका कारणासाठी टोचतं आहे. केशकर्तनालयाच्या मालकाविरोधात आता किरण ठाकूर यांनी पोलीस तक्रार नोंदवली आहे. एकूणच सध्या नागपुरात हा मिशीवाद चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. मिशी हा अभिमानाचा मुद्दाच छाटल्यामुळे ठाकुरांची चीडचीड होते आहे. पण यातून इतरांची मात्र करमणूक होते आहे.