विष्णू बुरगे, झी मीडिया लातूर : लातूर आणि पाणीटंचाई हे जणू समीकरणच बनलंय. त्यामुळे रेल्वेने पाणी आणण्याची वेळही आली होती. पण यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असूनही लातूर शहरातील नागरिकांना पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे, काय आहे नेमका प्रकार पाहुयात झी 24 तास स्पेशल रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिकेकडून दुषित पाणी पुरवठा
खरतर पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे.पण लातूर महानगरपालिकेला मात्र याचा विसर पडल्याचं दिसतंय. गेल्या महिनाभरापासून शहरात जो पाणीपुरवठा केला जातो हे पाणी दुषित आहे. या पाण्याचा रंग चक्क पिवळा आहे. हे पाणी पिण्या योग्य तर सोडाच दैनंदिन वापरासाठीही योग्य नाही. त्यामुळे लातूर महानगरपालिकेकडून पाच लाख नागरिकांच्या जिवाशी खेळ होत असल्याचं पाहायला मिळतंय. आम्हाला पिवळ्या पाण्याची शिक्षा मिळत असल्याचा संताप लातूरकर व्यक्त करत आहेत. 


पाणी पुरवठा राज्यमंत्र्याचा जिल्हा
गेली काही वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आणि रेल्वेने पाणी आणण्याची वेळ ओढावली. पाच लाख लोकसंख्या असलेल्या शहरात महाराष्ट्रभरातून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. मात्र या सर्वांच्या जीवाशी खेळ महानगरपालिकेकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. 


गेल्या महिनाभरापासून पिवळं पाणी येत आहे. दुषित पाण्यामुळे अनेकांना आजारही जडत आहेत. विशेष म्हणजे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे हे याच जिल्ह्यातले आहेत. असं असतानाही त्यांच्याच जिल्ह्यात लोकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. 


पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक
लातूर शहरांमध्ये पिवळे पाणी येत असल्यामुळे भाजप आक्रमक झाली  आहे. माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात थेट महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 


लातूरच्या नागरीकांचा आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यात लक्ष घालून नागरिकांना पिवळ्या पाण्यापासून सुटका करणं गरजेचं आहे.