कपाळावर भिकारी लिहिले, पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्टरबाजी
पुण्यातील ससून हॉस्पिटल परिसरातील पाटलांचं ते पोस्टर जोरदार व्हायरल
Controversial poster against Chandrakant Patil : भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पुण्यातील पिंपरी येथे शाई फेक झाली. पाटील यांनी पैठणमधील कार्यक्रमामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच पार्श्वभूमीवर समता दलाच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यावर शाई फेक केली. शाईफेकीच्या घटनेनंतर राज्यातील आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुण्यातील आंबेडकरवादी संघटनांनी लाक्षणिक उपोषण केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाटील यांना अटक करा अशी मागणीही केली. पुण्यात पाटील यांच्याविरोधात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. यातील ससून हॉस्पिटलच्या परिसरातील एक पोस्टर चर्चेत आलं आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टरवर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व महापुरुषांना भिकारी संबोधणाऱ्या 'भिकारी' चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध, असा मजकूर लिहिला आहे. याच पोस्टरवरील चंद्रकांत पाटील यांच्या फोटोतील कपाळावर भिकारी असं लिहिण्यात आलं.
दरम्यान, आधीच वातावरण तापलेलं असताना या पोस्टरमुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थही घोषणाबाजी करण्यात आली आहे.