शिवस्मारक चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान; भाजप आमदाराने मागितली माफी
विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.
नागपूर: विधानसभेत शिवरायांच्या सागरी स्मारकाच्या चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजप आमदार अतुल भातखळकरांना अखेर माफी मागावी लागली. मात्र विरोधकांनी भातखळकरांच्या निलंबनाची मागणी केली. विरोधकांसोबत शिवसेना आमदारांनीही आक्रमक भूमिका घेत भातखळकरांच्या माफीची मागणी केली. त्यामुळे भाजप विरुद्ध इतर सर्वपक्ष असं चित्र विधानसभेत पुन्हा पाहायला मिळालं. सुरूवातीला भातखळकरांनी शब्द मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.
वेलमध्ये घोषणाबाजी
शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्य़ा पुतळ्यावरून आज विधानसभेत एकच गदारोळ बघायला मिळाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याच्या उंची कमी केलेली नसल्याचा दावा केला. विरोधकांनी गोंधळ घालून वेलमध्ये घोषणाबाजी केली. विरोधकांनी जय भवानी-जय शिवाजीची घोषणाबाजी केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन वेलमध्ये
विधानपरिषदेत अभूतपूर्व गोंधळ झालाय. मंत्रीच स्वतः वेलमध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन वेलमध्ये उतरले. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशात सर्वाधिक कमी जागा असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी यांना धारेवर धरलं. मराठवाडामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील कोटा हा १९८५ पासून असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र यावर संतापलेल्या विरोधकांनी गोंधक घातला आणि या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे अशी मागणी केली. मात्र यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह सत्ताधारी आमदार वेलमध्ये उतरले. त्यामुळे विरोधकांनी आणखीनच गोंधळ घातला.