ऑनलाईन गेमनंतर आता करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर? नाशिकच्या कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार
Nashik Crime News : ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशापासून ठाण्यातल्या मुंब्रा परिसरापर्यंत या प्रकरणाचे जाळे पसरल्याचे नुकतेच समोर आले होते. अशातच आता मालेगावमध्ये करिअर गाईडन्सच्या नावाखाली धर्मांतरणाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला आहे.
निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : नुकतच ऑनलाइन गेमिंगद्वारे (Online game) अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचे प्रकरण उत्तर प्रदेशातील (UP Crime) गाझियाबादमध्ये उघडकीस आले. रविवारी पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला अटक केली आहे. या प्रकरणात गुजरातहून आलेल्या एका फोन कॉलमध्ये मुंब्रा भागात तब्बल 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दुसरीकडे आता नाशिकच्या (Nashik Crime) मालेगावमध्ये करिअर गाईडन्स नावाखाली विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण, धर्म परिवर्तनाचे धडे जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती कळताच हिंदुत्ववादी संघटनांना कार्यक्रमस्थळी गदारोळ घातला. दरम्यान या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई केल्याने संतप्त पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस स्थानकात दाखल होत पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.
मालेगावच्या एमएसजी महाविद्यालयात पुण्याच्या सत्य मलिक लोक सेवा ग्रुपतर्फे भारतीय छात्र व विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख्य व्याख्यात्यांनी प्रथम कुराणमधील कलमा व आयती वाचून दाखवत इतर धर्मीय मुलांनाही मुस्लिमांप्रमाणे शिक्षण घेण्याचे आमिष दाखवून धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यक्रमस्थळी दाखल होत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मालेगावमध्ये तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले.मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. महाविद्यालय प्रशासनाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या पालकमंत्री दादा भुसे यांनी थेट कॅम्प पोलीस स्थानक गाठत ठाण मांडले. दादा भुसे यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून देत पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधत सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली. दरम्यान या प्रकारानंतर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमला होता. यावेळी जमवाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने विनापरवानगी कार्यकम घेतल्याने प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान दादा भुसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांचे जाब जबाब नोंदवित कार्यक्रमाचे आयोजक,व्याख्याते व महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून , पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. दुसरीकडे राज्यभर विविध सध्या वातावरण चिघळले असताना संवेदनशील समजल्या होणाऱ्या मालेगावही जातीय वादाची ठिणगी पडली आहे. नागरिकांनी समजून घेत मालेगावात या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था राखण्याची खरी गरज आहे.