Vegetable Price Hike In Maharashtra: एकीकडे उन्हाचा कडाका तर एकीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहेत. अवकाळी पावसामुळं शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तर, एकीकडे कडक उन्हामुळं शेती पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. यामुळं भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचेही गणित बिघडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने त्याचा परिणाम शेतमालावर जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. बुधवारी (दि. २२) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर ७५, तर मेथी व कांदापात ५० रुपये प्रतिजुडी असा बाजारभाव मिळाला आहे. 


जी चांगल्या प्रतीची मेथी किंवा कोथिंबीर आहे. या कोथिंबीर आणि मेथीला उच्चांकी भाव मिळाला आहे.  मात्र दोन ते तीन नंबर क्वॉलिटीच्या मेथीला तीस ते पस्तीस रुपयांच्या अधिक भाव मिळतोय. उन्हामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडल्याने शेतमालाची आवक घटली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून दाखल होणाऱ्या कोथिंबीर, मेथी, कांदापात व शेपू मालावर परिणाम जाणवला आहे.


 सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचे थैमान 


बुधवारी संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातले. ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळाचा एक व्हिडिओ वायरल झाला असून यात जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे. या वादळात एक पान टपरी पाला पाचोळयाप्रमाणे उडून गेली. तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. 


पावसामुळं केळीच्या बागा उद्ध्वस्त


यवतमाळात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने महागाव तालुक्यातील गुंज माळकिनी शिवारात केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. सध्या केळीला चांगला दर असताना वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. याच परिसरात भाजीपाला पिकाची देखील आदर्श शेती होते. मात्र त्याला देखील प्रचंड तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सततची नापीकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती यात शेती करणे अवघड झाले असून सरकारने देखील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशा स्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण म्हणून जोखीम स्थितीत झालेल्या नुकसानीची भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.