मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ८९ रुग्ण झाले आहेत. तर देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४१५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात महाराष्ट्रात कोरोनाचे नवे १५ रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये मुंबईत १४ तर पुण्यात एक रुग्ण आढळला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील जनतेच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात २२ मार्चला कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात काल जनता कर्फ्यूनंतर कलम १४४ लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे ५ पेक्षा अधिक जण आढळले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन असणार आहे. महाराष्ट्राकत कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणी याचा धोका अधिक असल्याने सरकारने काल लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच देशभरातील सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.


कोरोनाचं संकट हे महाराष्ट्रावर अधिक आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर लोकांनी सहकार्य करण्याची अधिक गरज आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत लोकांना विनंती केली होती की, 'गरज असेल तरच बाहेर पडा.'