नाशिक : कोरोनाचा संसर्ग (Coronavirus)झपाट्याने वाढत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. मालेगाव आणि निफाडमध्ये कोरोना संसर्गाचा थैमान दिसून येत आहे. तर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील एकूण 44 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. बाधितांत 7 अधिकारी आणि 37 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर तातडीने करण्यात आले आहे.  (44 police Corona positive in Nashik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच कृषी विभाग महसूल विभागसह अनेक शासकीय विभागातील अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. निफाडमध्ये कोरोना संसर्गाचा थैमान सुरुच आहे. नाशिक आणि मालेगावनंतर निफाडची कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे. 155 जणांचे कोरोना बाधित अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 175 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


निफाड तालुक्याची कोरोना बधितांची एकूण संख्या पोहोचली 5816 आहे. कोरोनावर 4850 जणांनी मात करत घरवापसी केली आहे. उर्वरित 791 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, नाशिक शहरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या पाठोपाठ आता पोलिस आयुक्तच थेट रस्त्यावर उतरले होते. दीपक पाण्डेय यांनी रविवारी कारंजा, मेनरोड या भागात असलेल्या बाजारपेठेत जाऊन नागरिक शिस्तीचे पालन करत आहे की नाही याचा आढावा घेतला. 



कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नियमावली कठोर करणे गरजेचे असले तरी अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधावर विचार करणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन थेट मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवारी कारंजा ते धुमाळ पॉइंटपर्यंत पायी चालत दुकानदारांशी संवाद साधला. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती चर्चा केली. 


संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्वांनी मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना आयुक्त दीपक पांडे यांनी दिल्या आहे. दरम्यान शहरात कोरणाची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी 'सुपर स्प्रेडर्स' असलेल्या रुग्णांनी कोरोनाला थांबवण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षाही पांडे यांनी व्यक्त केली.


मालेगाव पुन्हा धोकादायक शहर होत आहे. नाशिकसोबत कोरोनाचा वाढता वेग मालेगावातही दिसून येत आहे. मालेगावात कोरोना प्रादुर्भावाचा वेग अजूनही 61 टक्के झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून तातडीने हजर होण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहे.