मुंबई : नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही संपूर्णतः लॉकडाऊन करण्याचा विचार पुढे येत आहे. याबाबत पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे काही दिवसात नवी मुंबईत पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे, कल्याण-डोंबिवली अर्थात केडीएमसी आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेने १० दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. नवी मुंबईमध्ये कंटेन्मेंट झोन असणाऱ्या १२ ठिकाणी सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, नवी मुंबईत कोरोना संक्रमणाचा धोका कायम दिसून येत आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.  त्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी हे लॉकडाऊन जारी होण्याची दाट शक्यता आहे.


दरम्यान, नवी मुंबईत काल तब्बल १७८ रुग्ण आढळले. नवी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६६०५ वर गेला असून काल चार जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या २११ वर पोहोचली आहे. बेलापूर  २१, नेरुळ२० , वाशी १३, तुर्भे ४, कोपरखैरणे २२, घणसोली २९ , ऐरोली ५२, दिघा १७ असे रुग्ण आढळून आले आहेत. काल एका दिवसात १२२ जणांनी केली कोरोनावर मात केली असून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा देखील ३७५४ पार झाला आहे.


कोरोना विषाणू संसर्गाविषयी सावध राहून लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत, असे आवाहन करतानाच प्रत्येकाने काळजी घेऊन स्वत:ला व इतरांना सुरक्षित ठेवावे. याकरिता साबण आणि पाणी वापरुन किमान २० सेकंद आपले हात स्वच्छ धुवावेत, शिंकताना तसेच खोकताना आपल्या नाकावर आणि तोंडावर रुमाल धरावा, सर्दी किंवा फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळावा, मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून तसेच उकडून घ्यावीत, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा अशी काळजी घ्यावी, असे आवाहन  महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. 


 नवी मुंबई महानगरपालिका याबाबत सतर्क असून नागरिकांकरिता 1800222309 / 1800222310 हे विनामुल्य टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोरोना विषाणूला घाबरुन जाऊ नये.  नागरिकांनी सावध राहून लक्षणे दिसल्यास उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.